ससून रुग्णालयात पार्किंगच्या नावाखाली लूट; दररोज हजारोंकडून अतिरिक्त शुल्काची वसुली

पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची पार्किंगच्या नावाखाली सर्रास लूट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पार्किंगचा ठेका मिळवलेल्या ठेकेदाराने ठरलेल्या दरांपेक्षा जास्त शुल्क वसूल करत नागरिकांना अक्षरशः लुबाडल्याचे उघड झाले आहे.
‘शक्ती कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराने घेतलेल्या पार्किंगच्या पावतीवर अत्यंत लहान अक्षरात दर नमूद केलेले असून, ती माहिती वाचू नये म्हणून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मुद्दाम शिक्का त्या भागावर मारला जातो. याशिवाय, दोन तासांच्या पार्किंगसाठी ५ रुपये आकारण्याऐवजी १० रुपये घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, वाहन लावणाऱ्याने एक तासाच्या आत परतले तरी उर्वरित पैसे परत केले जात नाहीत.
दररोज ससूनमध्ये सुमारे दीड ते दोन हजार वाहने पार्किंगसाठी येतात. यावरून दररोज हजारो रुपयांची वसुली होत असून, यातील बहुतांश वसुली ही ठरलेल्या दरांच्या पलिकडची आहे. अनेकदा वाहन लावताना पावती देणारी व्यक्ती वाहन काढताना उपलब्ध नसते. अशावेळी दुसरा कर्मचारी पैसे परत देण्यास टाळाटाळ करतो, ज्यामुळे वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.
रुग्ण व नातेवाईकांची दिवसभराची दमछाक
खासगी रुग्णालयातील वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येतात. ओपीडी तपासणीसाठी येणारे रुग्ण सरासरी एक ते दीड तास थांबतात, तर भेटीकरिता येणाऱ्यांना अर्धा तासापेक्षा अधिक थांबू दिले जात नाही. रुग्णांना जेवण पोहचवण्यासाठी अनेक वेळा नातेवाईकांना दिवसातून दोन-तीन वेळा यावे लागते. प्रत्येकवेळी पार्किंग शुल्काच्या वादाला सामोरे जावे लागत आहे.
अनधिकृत वसुलीचा आरोप, दरपत्रकाचा फलकही नाही
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ससून रुग्णालयाच्या परिसरात कुठेही अधिकृत दरपत्रक लावलेले नाही. वाहनधारकांकडून कोणतेही स्पष्ट माहिती न देता सरळ सरळ पैसे वसूल केले जात आहेत. शिवाय रुग्णालयाच्या विविध इमारतींच्या बाजूला, अंतर्गत रस्त्यांवर, कंपाऊंड शेजारी – जिथे जागा मिळेल तिथे पार्किंगचे पैसे घेतले जात आहेत.
निविदा प्रक्रिया असूनही गैरप्रकार सुरूच
ससून प्रशासनाने पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबवून ठेका ‘शक्ती कन्स्ट्रक्शन’ या कंपनीला दिला. परंतु ऑनलाइन पेमेंट केल्यावर ‘रूषभ इंटरप्रायजेस’ नाव समोर येते, जे अधिक संशयास्पद आहे. प्रशासकीय अधिकारी डॉ. गोरोबा आवटे यांनी सांगितले की, “निविदेतील अटींचे पालन झाले नाही तर ठेकेदाराला समज दिली जाईल. तरीही गैरप्रकार सुरू राहिल्यास कारवाई केली जाईल.”
नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांच्या पाठबळाचा आरोप
मागील काही महिन्यांपूर्वी ठेकदाराचा कालावधी संपल्यानंतर पार्किंग शुल्क आकारले जात नव्हते. तेव्हा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु अलीकडे पुन्हा नव्याने ठेकेदाराची माणसे उभी राहून शुल्क वसूल करताना दिसत आहेत. त्यामुळे, “ठेकेदाराची नेमणूक कशासाठी?” आणि “या लुटीला ससूनच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे का?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
—
ठरलेले दर (परंतु अंमलात नसलेले):
१ ते २ तास: ₹५
२ तासांहून पुढे १२ तासांपर्यंत: ₹१०
१२ तासांहून पुढे २४ तासांपर्यंत: ₹१५
—
➤ संपादकीय प्रश्न :
ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात रुग्णांऐवजी ठेकेदारांचे हित जपले जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे?
—