दुधनी भीमनगरातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव, विकासापासून वंचित
सुशिक्षित युवकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा विचार करावा – सैदप्पा झळकी
अक्कलकोट, दि. १२ (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भीमनगरमध्ये नागरिकांना दिवाबत्ती, गटार व्यवस्था आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असून नागरिक विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिस्थितीत, आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करण्यासाठी येथील सुशिक्षित युवकांनी बैठक घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सैदप्पा झळकी म्हणाले की, भीमनगरमधील नागरिकांना अनेक दिवसांपासून वीज, पाणी, गटारसुविधा यांचा अभाव आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे दुर्लक्ष केले असून, वारंवार तक्रारी देऊनही त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. येथील बहुतांश नागरिक अत्यंत गरीब आहेत. त्यांना शेतजमीनही नाही, आणि रेशन कार्डासाठी वारंवार तहसील कार्यालयात विनंत्या करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. स्मशानभूमी व बौद्ध विहार यांसारख्या विकासकामांबाबतही प्रयत्न करूनही त्यांचा उपयोग झालेला नाही, अशी नाराजी सैदप्पा झळकी यांनी व्यक्त केली.
यावेळी शाखाध्यक्ष संतोष जन्ना, शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, निंगप्पा निंबाळ यांसह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.