Pune Rain Update: पुणेकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी सावध रहा! पुण्यात येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार, वाचा सविस्तर
पुणे: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. काल मुंबईत उष्णतेचा सामना केल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या सरींनी दिलासा दिला, आणि आज पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांत पाऊस सुरु झाला आहे.
हवामान विभागाने (IMD) मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रविवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आणि परभणी जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागांतही शनिवार आणि रविवारला मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यभरात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.