पत्रकार मोहिनी जाधव यांच्याबद्दल शिवसेना नेते वामन म्हात्रे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, ‘तुमच्यावर बलात्कार झाला आहे काय’ – व्हिडिओ
बदलापूर येथील आदर्श स्कूलमध्ये दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या वार्तांकनादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
कथित लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर नागरिकांनी केलेल्या संतप्त आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी मोहिनी जाधव तिथे पोहोचल्या होत्या. यावेळी वामन म्हात्रे यांनी या महिला पत्रकारास उद्देशून, ‘तुम्ही असे वार्तांकन करत आहात, जणू तुमच्यावरच बलात्कार झाला आहे’, असा धक्कादायक आरोप केला. म्हात्रे हे माजी नगराध्यक्ष असल्याने या विधानामुळे अधिकच वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोहिनी जाधव यांनी म्हात्रे यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचा आरोप करत जाधव यांनी पोलीस आणि म्हात्रे यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटासाठी काम करण्याचा आरोप केला असून, म्हात्रे यांच्या विधानानंतर सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वामन म्हात्रे यांची प्रतिक्रिया
वामन म्हात्रे यांनी पत्रकार जाधव यांच्या आरोपांना फेटाळले आहे. म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांनी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ते आग्री समाजामध्ये जन्मलेले आहेत आणि कोणत्याही महिलेबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणारे नाहीत, असे म्हटले. त्यांनी आपल्या विधानाच्या संदर्भात कोणतेही पुरावे देण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण?
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील तीन ते चार या वयोगटातील दोन मुलींवर शाळेतीलच परिचारकानेक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शाळेच्या फाटकासमोर आंदोलने केली तसेच काही पालक शाळा आवारा घुसले. त्यांनी शाळेतील मालमत्तेची तोडफोड केली. काही पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत रेल्वे रोको केला. ज्यामुळे बराच काळ रेल्वे ठप्प झाली.