पुणे शहरः पुण्यात ‘रिपाइं’तर्फे पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय ते पुणे महानगरपालिकेपर्यंत आयोजन -व्हिडिओ
व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा.
पुणे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील काही भागांवर पुराचा प्रचंड तडाखा बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) तर्फे पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा आक्रोश मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन आणि पुणे महानगरपालिका येथे धडकला.
या मोर्चात ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांसह शेकडो पुरग्रस्त नागरिक भर पावसात सहभागी झाले होते. तीनही विभागांसमोर निवेदन देऊन पूरग्रस्तांना तातडीने २५ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी ‘रिपाइं’कडून करण्यात आली. ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला, ज्यामध्ये प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, वसीम पैलवान, ऍड. मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, यशवंत नडगम, बाबुराव घाडगे, वीरेन साठे, निलेश आल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय सोनवणे यांनी सांगितले की, पाण्याचा विसर्ग करताना पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाअभावी पुण्यात जवळपास दहा हजार कुटुंबे पुराच्या फटक्याने बाधित झाली आहेत. अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, आणि पुढील काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराचा धोका आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात यावेत.
बाळासाहेब जानराव यांनी सांगितले की, पाण्याचा विसर्ग कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांचा विसर्ग खडकवासला धरणात होत असल्याने हा धोका कायम आहे. याला पर्याय न दिल्यास १९६२ सारखी पूरपरिस्थिती येऊ शकते. हे टाळण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून रायगडच्या दिशेने पाणी सोडण्याचा विचार करावा.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले की, पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा-मुठा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी. प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत दिली जावी.
परशुराम वाडेकर यांनी नमूद केले की, नदीसुधार योजनेमुळे नदीपात्राची रुंदी कमी झाली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम, नदीमध्ये राडारोडा टाकणे, मनपाच्या विविध विकासकामे, नदीपात्रातील अतिक्रमणे, नाल्यांवरील अतिक्रमणे यामुळे पाणी नागरी वस्तीत शिरत आहे. पूर्वी ९० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पूर आता २८ हजार क्युसेस पाणी सोडल्यावर येतो, हे चिंताजनक आहे. आक्रोश मोर्चात शांतीनगर, आदर्शनगर, बोपोडी, खडकी, येरवडा आणि इतर भागांतील पूरग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.