पुणे: विसर्जन घाटाचा निधी कुठे गेला? साडेपाच लाखांचा प्रश्नचिन्ह: कामे नाही, तरी बिले कुठे? – येरवड्यात शिवसेनेचे निवेदन – व्हिडिओ

पुणे: येरवडा परिसरातील विसर्जन घाटावर पुन्हा एकदा निधीच्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून साडेपाच लाख रुपये डागडुजीसाठी मंजूर असूनही, प्रत्यक्षात कामे न झाल्याचे उघड झाले आहे.
पहा व्हिडिओ
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी महापालिका दरवर्षी घाटांची दुरुस्ती, स्वच्छता व इतर सुविधा पुरवते. परंतु, येरवड्यातील श्री सावता माळी विसर्जन घाटावर रंगरंगोटीपासून स्वच्छतागृहांपर्यंत कोणतीही कामे झालेली नाहीत. मंडप उभारला तरी त्यावर स्वागताचे फलक नसल्याने कामाचा ठेका कुणाला देण्यात आला हेच कळत नाही.
याविरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर शिवसेना शहर संघटक आनंद गोयल आणि येरवडा एकीकरण समितीने थेट सहायक आयुक्तांकडे धाव घेतली. त्यांच्या निवेदनात घाटावरील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, वह्यांवर खोटी सही करून गैरहजेरी लपविणे, तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधी ‘स्वाहा’ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहायक आयुक्त अशोक भवारी यांनी उद्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, निधीचा अपव्यय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महापालिका प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रश्न नागरिकांचा – विसर्जन घाटासाठी मंजूर झालेला निधी गेला तरी कुठे?
—