विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता : येरवडा वसतिगृह अचानक विश्रांतवाडीत हलवण्याचा निर्णय, सामूहिक बहिष्काराने निषेध

0
IMG_20250629_131520.jpg

पुणे : येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडी येथे अचानक स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शनिवारी (ता. २८) विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या जेवणावर बहिष्कार टाकत निषेध व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, येरवडा वसतिगृहात अभ्यासासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा – अभ्यासिका, ग्रंथालय, बाग आणि सुसज्ज जिम – उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने वचन दिले होते की, नवीन वसतिगृहात या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या कीच स्थलांतर केले जाईल. मात्र, सद्यस्थितीत विश्रांतवाडी येथील वसतिगृहात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया तीव्र

“हा निर्णय आमच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणारा आहे,” असे म्हणत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात रविवारी (ता. २९) शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

“चार दिवसांत वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश आले. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार आहे. यामुळे आमच्यावर आर्थिक व मानसिक ताण येईल,” अशी चिंता विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

प्रशासनाकडून संवादाचा अभाव

विद्यार्थ्यांनी गृहपाल व गृहप्रमुख यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

विद्यार्थ्यांपुढील अडचणींचा डोंगर

अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधा अचानक नष्ट

प्रवासाचा खर्च व वेळ वाढल्याने आर्थिक व मानसिक त्रास

अभ्यासिका, ग्रंथालय, जीम, बाग यांसारख्या सुविधा नाहीत

नवीन परिसरात असुरक्षिततेची भावना

जेवणाचा दर्जा आणि वेळ व्यवस्थापनात अडचणी


“स्थलांतर थांबवा!” – विद्यार्थ्यांची मागणी

“इथे अभ्यासासाठी शांतता, वाहतुकीची सुलभता आणि सुरक्षित परिसर आहे. चार दिवसांत स्थलांतर म्हणजे आमच्या शिक्षणावर घाला आहे,” असे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed