पुणे: भूमि अभिलेख विभागाला बसपाचा इशारा; प्रॉपर्टी कार्ड, जमिनीच्या सीमारेषेतील गोंधळावर बसपाची हाक: “बसपा स्टाईल आंदोलनासाठी सज्ज व्हा”- माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड, जमिनीची मोजणी, सीमारेषा दुरुस्ती यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या उंबरठ्यावर वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, दलालशाही आणि भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, याविरोधात बहुजन समाज पार्टीने तीव्र भूमिका घेतली आहे.
प्रदेश महासचिव व पश्चिम महाराष्ट्र झोनचे प्रभारी तसेच माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला की, “नागरिकांच्या समस्या महिन्याभरात मार्गी लावल्या नाहीत, तर भूमि अभिलेख विभागाचा घेराव घालून बसपा स्टाईल आंदोलन छेडले जाईल.”
दलालशाहीमुळे नागरिकांची पिळवणूक
चलवादी म्हणाले की, विभागातील सर्वेक्षक नागरिकांना उघडपणे त्रास देतात. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘लक्ष्मीप्रसाद’ द्यावा लागतो. योग्य सर्वेक्षक नसल्याने जमिनीचे नकाशे व सीमारेषा चुकीच्या होतात. अनेकदा बनावट दाखले तयार करून जमिनी दुसऱ्यांच्या नावावर दाखवल्या जातात. त्याच जमिनीचे वारंवार डिमार्केशन करून नागरिकांची पिळवणूक केली जाते.
चुका आणि विलंबाचे धोरण
प्रॉपर्टी कार्डमध्ये नाव, क्षेत्रफळ, वारसांची नावे यामध्ये सातत्याने चुका होतात. ‘म्युटेशन एंट्री’साठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. सर्वसामान्य माणूस सीमारेषा दुरुस्तीसाठी खर्च करतो, पण दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्याची आणखी फसवणूक केली जाते.
नागरिक रस्त्यावर
या भ्रष्टाचारामुळे हजारो लोकांच्या घरांना बेकायदेशीर ठरवले जात आहे. सामान्य माणसाला रस्त्यावर आणले जात आहे. “सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर नागरिकांच्या रोषाचा भडका उडेल हे निश्चित आहे,” असा इशारा डॉ. चलवादी यांनी दिला.
—