पुणे: ताडीवाला रस्त्यावर महाप्रसादादरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : ताडीवाला रस्ता परिसरातील प्रायव्हेट रोड येथे महाप्रसादाच्या आयोजनादरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांत जोरदार मारामारी झाल्याची घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार महिलांसह एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रायव्हेट रोड परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या व ताटे फेकून दिल्याने परिसरात गोंधळ उडाला.
याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून आरोपींनी घरातील महिलांना मारहाण केली, तसेच अजय याचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनीही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाप्रसादाच्या वेळी झालेल्या वादातून आरोपींनी काळे आणि त्याचा मित्र भूषण भंडारी यांना मारहाण केली, तसेच गीता घाटे यांनाही मारहाण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करत आहेत.