पुणे: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३३ जणांवर गुन्हा दाखल, ३४ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : चोलीतील बुर्डेवस्ती परिसरात राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाने छापा घालून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २७ जणांना ताब्यात घेतले असून, एकूण ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी रोकड, जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी आणि कार असा एकूण ३४ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
शनिवारी रात्री खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कानगुडे, तसेच हवालदार पोटे, गोडांबे, कांबळे, जाधव हे दिघी परिसरात पेट्रोलिंग करत असताना ही माहिती मिळाली. वाघजाई मंदिराच्या मागे बुर्डेवस्ती येथील एका खोलीत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याचे समजताच पोलिसांनी रात्री ८ वाजता अचानक छापा घातला.
छाप्यात गोंधळ उडाल्याने ४ ते ५ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील एक जण धावाधावीत पडून किरकोळ जखमी झाला. उर्वरित २७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या संदर्भात दादाभाऊ नंदाराम साबळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
—